![]() |
पुणे : येरवडा कारागृहातून शिवाजीनगर न्यायालयात सुनावणीसाठी नेण्यात येणाऱ्या कैद्यांच्या बंदोबस्तासाठी नेमलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने सहकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली.
'मी पोलिस आयुक्तांना घाबरत नाही', अशी धमकी देऊन सहकारी पोलिस कर्मचाऱ्याला दगड फेकून मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले.
केशव महादू इरतकर असे निलंबित केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. शिवाजीनगर पोलिस मुख्यालयातील पोलिस कर्मचाऱ्यांची येरवडा कारागृहातून सुनावणीसाठी नेण्यात येणाऱ्या कैद्यांच्या बंदोबस्तासाठी नेमणूक करण्यात आली आहे.
पोलिस कर्मचारी इरतकर शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात नियुक्तीस आहे. ११ नोव्हेंबर रोजी इरतकर आणि सरकारी पोलिस कर्मचारी येरवडा कारागृहातून कैद्यांना आणण्यासाठी गेले होते. त्याच्या सोबत पोलिस कर्मचारी संदीप नाळे बंदोबस्तास होते. त्यावेळी इरतकर आणि नाळे यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला.
'तुम्ही निवृत्त सैनिक काही कामाचे नाहीत. माझ्याविरोधात यापूर्वी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. मी पोलिस आयुक्तांना घाबरत नाही', अशी धमकी इरतकर याने नाळे यांना दिली. त्यावेळी पोलिस उपनिरीक्षक धायगुडे यांनी त्याला समजावून सांगितले. तेव्हा इरतकरने नाळे यांना शिवीगाळ केली.
रस्त्यावर पडलेला दगड उचलून जीवे मारण्याची धमकी दिली. इरतकर याच्या वर्तणुकीबाबतचा अहवाल वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी शिवाजीनगर पोलिस मुख्यालयाच्या पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांना पाठवला. या प्रकरणी त्याची चौकशी करण्यात आली.
हेही वाचा : पोलीस तक्रार विनंती अर्ज कसा लिहावा.
पोलिस कर्मचारी असल्याने कायद्याची माहिती आहे. सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांबरोबर कसे वागावे, याची माहिती असताना सार्वजनिक ठिकाणी इरतकर याने केलेले वर्तन पोलिस दलाची प्रतिमा मलिन करणारे आहे, तसेच त्याचे वर्तन अशोभनीय असल्याने पोलिस उपायुक्त शिवणकर यांनी त्याला पोलिस दलातून निलंबित करण्याचे आदेश दिले.

