एकात्म मानव दर्शन व अंत्योदयाचे प्रतीक... पंडित दीनदयाल सेवा प्रतिष्ठान!

Admin
0
Ekatm-manav-darshan

यवतमाळ येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती समारोहात प्रमुख उपस्थिती दर्शवली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, समाजातील गोरगरीब, वंचित व दुर्बल घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपले संपूर्ण जीवन वेचणारे प्रखर राष्ट्रवादी, एकात्म मानवदर्शनाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे विचार होते की, 'दीनदयाल सेवा प्रतिष्ठान'च्या कार्यातून जिवंत आहेत.

यवतमाळ येथील दीनदयाल सेवा प्रतिष्ठान ही जवळपास 25 वर्षांपूर्वी सुरू झालेली संस्था आज वटवृक्षासारखी विस्तारली असून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिला आणि मागास आदिवासी पारधी समाजासाठी मदतीचा हात पुढे करत आहे. ही संस्था एकात्म मानव दर्शन व अंत्योदय या विचारांचे जिवंत उदाहरण ठरली आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवनप्रवासाचे विविध पैलू यावेळी अधोरेखित केले. अत्यंत खडतर परिस्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण करून इंग्रजांच्या नोकरीऐवजी समाजसेवेचा मार्ग निवडला. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कातून त्यांनी पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून काम केले आणि नंतर जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्षही झाले. एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळतानाही त्यांच्या जीवनात कोणताही बदल झाला नाही; ते सदैव त्याग व साधेपणाचे प्रतीक राहिले, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी भांडवलशाही व साम्यवाद या दोन विचारसरणींपेक्षा वेगळा तिसरा विचार मांडला. भारतीय जीवन पद्धतीतच सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे उत्तर आहे, असे त्यांनी सांगितले. एकात्म मानव दर्शनाचे मूळ तत्त्व म्हणजे अंत्योदय... समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या विकासातून राष्ट्राचा विकास. 

या विचारावर आधारित काम करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीबांसाठी घरे, शौचालये, गॅस, वीज आणि रोजगार उपलब्ध करून दिले. परिणामी गेल्या 10 वर्षांत 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले व भारत 11व्या क्रमांकावरून जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

पंडित दीनदयाल यांनी 'हर खेत को पानी हर हात को काम' हा विचार मांडला होता, दीनदयाल सेवा प्रतिष्ठान त्याच विचाराला पुढे नेण्याचे काम करत आहे. प्रतिष्ठानाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक शेतीचा एक आदर्श प्रकल्प सुरू केला असून उत्पादन खर्च कमी करण्यासोबत जमिनीची सुपीकता वाढवण्याचे काम सुरू आहे. 

राज्यात पंचवीस लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, आतापर्यंत तेरा लाख हेक्टर जमीन या पद्धतीखाली आली आहे. 

Ekatm manav darshan | एकात्म मानव दर्शन व अंत्योदयाचे प्रतीक... पंडित दीनदयाल सेवा प्रतिष्ठान!

वातावरणातील बदलांचा सामना करत शेती अधिक चांगल्या प्रकारे कशी करता येऊ शकेल यासाठी सरकारने नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना सुरू केली आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी केंद्र सरकारमार्फत 'लखपती दीदी' योजना सुरू करण्यात आली आहे, यामार्फत येत्या काळात महाराष्ट्रात 1 कोटी महिला लखपती होतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

पारधी समाजाच्या शिक्षण, आरोग्य व रोजगाराच्या क्षेत्रात केलेल्या कार्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की, प्रतिष्ठानने या समाजाच्या जीवनात घडवलेले परिवर्तन लक्षणीय आहे. 

प्रखर राष्ट्रवादी, एकात्म मानवदर्शनाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे विचार अमर आहेत आणि हेच विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातून संपूर्ण जगापर्यंत पोहोचत आहेत.

यावेळी मंत्री डॉ. अशोक उईके, मंत्री संजय राठोड, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)