![]() |
Nandurbar Jilha Arogya Seva : नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य सेवा टास्क फोर्सच्या माध्यमातून सुधारणार – मा. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
नंदुरबार, 13 सप्टेंबर 2025: राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यांतील कुपोषण, सिकलसेल आणि आरोग्य समस्यांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारने विशेष पावले उचलली आहेत. याच पार्श्वभूमीवर आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. प्रकाश आबिटकर यांनी काल नंदुरबार जिल्ह्याच्या दुर्गम भागांचा दौरा करून आरोग्य सेवा, कुपोषण आणि सिकलसेलवरील उपाययोजनांचा आढावा घेतला.
या दौऱ्यानंतर आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी आरोग्य सेवेत सुधारणा करण्यासाठी टास्क फोर्सच्या स्थापनेची घोषणा केली.
या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील आरोग्य सेवांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचा संकल्प करण्यात आला आहे. बैठकीस मा. आमदार आमश्या पाडवी, आमदार राजेश पाडवी, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
रुग्णवाहिका सेवा होणार सक्षम:
दौऱ्यात 108 रुग्णवाहिका सेवेबाबत आलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेण्यात आली आहे. यावर तात्काळ कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविण्यात आला असून, जुन्या रुग्णवाहिकांच्या बदलासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत नव्या रुग्णवाहिका उपलब्ध होतील. विशेषतः दुर्गम भागात या सेवा सक्षम करण्यावर भर दिला जाईल.
आरोग्यसेवेवर लक्ष ठेवण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप:
प्रत्येक मतदारसंघात आरोग्य सेवा प्रभावीपणे चालवण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला जाणार असून, यात संबंधित आमदार, जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांचा समावेश असेल. या माध्यमातून रुग्णालयातील स्वच्छता, औषधांचा दर्जा, तातडीच्या तक्रारी आणि कारवाई यावर लक्ष ठेवले जाईल. स्वच्छता नसल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाईचे निर्देशही देण्यात आले आहेत.
सिकलसेल व कुपोषणावर गंभीर लक्ष:
जिल्ह्यात सिकलसेल आजाराचे प्रमाण चिंताजनक असून, यावर गंभीर व संवेदनशीलतेने काम करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले. तसेच कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘कुपोषणमुक्त भारत’ संकल्पनेनुसार ही पावले उचलण्यात येत आहेत.
रिक्त पदे भरण्याचा आग्रह:
जिल्ह्यातील आरोग्य सेवा सशक्त करण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरणे, ओपीडी व एएनएम पदे वाढवणे तसेच वैद्यकीय सुविधा अधिक सक्षम करणे याची मागणी आमदार राजेश पाडवी यांनी बैठकीत केली.
शाळेतील विद्यार्थ्यांना तात्काळ उपचार:
शासकीय आश्रम शाळांतील विद्यार्थी आजारी पडल्यास त्यांना घरी न पाठवता तातडीने आरोग्य संस्थेत दाखल करून उपचार देण्याची सूचना आमदार आमश्या पाडवी यांनी केली.
दुर्घटनाग्रस्त रुग्णांवर वेळीच उपचार आवश्यक:
रुग्ण दाखल करणे, डिस्चार्ज देणे यासंबंधी जबाबदारी निश्चित करावी, तसेच आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यास दोषींवर कारवाई करण्यात यावी, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
बोगस डॉक्टर्स व भोंदू बाबांवर कारवाई:
जिल्ह्यातील बोगस डॉक्टर आणि भोंदू बाबांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाने आरोग्य संस्थांची दुरुस्ती तातडीने करावी, असेही त्यांनी सांगितले.
महिला रुग्णालयाची पाहणी:
याआधी आरोग्यमंत्र्यांनी जिल्हा महिला रुग्णालयाची पाहणी करून विविध कक्षांची पाहणी केली आणि आवश्यक सूचना दिल्या.
आरोग्य सेवा सुधारण्याच्या या उपाययोजनांमुळे जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होईल आणि त्याचा थेट लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास मा. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला.
#आरोग्यसेवा #सुदृढमहाराष्ट्र #HealthForAll #HealthcareReform #PrakashAbitkar #TaskForceForHealth #108Service #RuralHealthcare #AdivasiDevelopment #MissionPoshan